छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवणाऱ्या संतोष लड्डा यांच्या बंगल्यातील कोट्यवधींच्या दरोड्यातील संशयित आरोपीचा एन्काऊंटर झाला आहे. दरोड्याचा संशयित आरोपी अमोल खोतकरला पोलिसांनी वडगाव कोल्हाटी येथे शिताफीने केलेल्या कारवाईत ठार केले. अत्यंत धक्कादायक वळण घेतलेली ही घटना आता गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवणारी ठरली आहे.
15 मेच्या पहाटे संतोष लड्डा यांच्या बंगल्यात पिस्तुलांच्या धाकावर 6 कोटींचा ऐवज लंपास करण्यात आला होता. उद्योजक लड्डा कुटुंबासह 7 मे रोजी अमेरिकेला गेले होते आणि त्यांच्या अनुपस्थितीत 19 वर्षांपासूनचा विश्वासू कामगार संजय झळके बंगल्याची देखरेख करत होता. हाच काळ दरोडेखोरांनी हेरला आणि एका सुनियोजित कटातून सहा जणांनी बंगल्यावर हल्ला चढवून सोनं, चांदी आणि रोकड लुटून नेली होती. या धक्कादायक गुन्ह्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे तपास हाती घेतला. 9 विशेष पथकांनी सलग 10 दिवस चोख गुप्तचरी व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांपर्यंत मजल मारली.
वडगाव कोल्हाटी परिसरात अमोल खोतकर लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. मात्र आरोपीने पळून जाण्यासाठी पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि नंतर थेट गोळीबार सुरू केला. प्रतिउत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला अशी सूत्रांनी माहिती दिली. या एन्काऊंटरमुळे पोलिसांची दहशत पुन्हा एकदा गुन्हेगाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे, दरोड्याच्या प्रकरणाचा पुढील तपास वेगात सुरू असून, गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्यासाठी पोलिस सज्ज आहेत.